| चिरनेर | प्रतिनिधी |
वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला होता. भरतभाई डालकी (44) असे या बेपत्ता खलाशाचे नाव असून गुरूवारी (दि.21) त्याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मोरा पोलिसांनी दिली आहे.
गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची ‘भवानी गंगा’ नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती. 19 ऑगस्ट रोजी मोरा बंदरात आलेल्या या मच्छीमार बोटीवर 6 खलाशी व 1 तांडेल असे एकूण सात जण होते. त्यापैकी भरतभाई डालकी हा खलाशी शौचालयाला गेला होता. बराच वेळ झाला तरी बोटीवर दिसून आला नसल्याने त्याचा शोध घेतला, मात्र कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती वपोनि सुर्यकांत कांबळे यांनी दिली. याप्रकरणी पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. अखेर त्या खलाशाचा मृतदेह गुरुवारी (दि.22) सकाळी सापडला असल्याची माहिती मोरा पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.परंतु; समुद्रात बोट बुडाल्याच्या घटनेने हालचाल गाजविणाऱ्या व्हिडिओ, वुत्तांसंदर्भात प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.







