बोडणी गाव पाण्याविना

पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जलजीवन मिशनअंतर्गत प्रतिव्यक्ती 55 लीटर पाणी देण्याचा गाजावाजा रायगड जिल्हा परिषदेने केला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, आजही अलिबाग तालुक्यातील बोडणी गाव पाण्याविना असल्याचे समोर आले आहे. या गावात लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोरडीच आहे. पाण्यासाठी येथील महिलांना दोन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत आहे.

अलिबाग तालुक्यातील बोडणी हे रेवस बंदरालगत असलेले एक गाव आहे. या गावाची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक असून, मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. लोकसंख्येच्या मानाने दरदिवशी प्रतिमाणसी 55 लीटर पाणी याप्रमाणे एक लाख 65 हजारांहून अधिक लीटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप येथील जनतेने केला आहे. या ठिकाणी कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. मासेमारीतून ही मंडळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे, ती मासळी बाजारात विकण्यास नेणे, सुकविणे अशा अनेक प्रकारची कामे पुरुषांसह महिलादेखील करीत असतात.


परंतु, गेली अनेक दिवसांपासून हे गाव पाण्याविना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्याही कोरड्या आहेत. दिवसभर मासेमारी करण्याबरोबरच मासळी विकण्याचे काम महिला करीत असताना, रात्र जागून पाण्यासाठी घालवावी लागत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या पाईपलाईनमधून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी बोडणी गावातील महिलांना वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन योजना राबविली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु, बोडणी गाव आजही पाण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे उघड झाले आहे. अलिबाग तालुक्यातील गावांतील ही समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोडवतील का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बोडणी गाव पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक वेळा विकत पाणी आणावे लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही.

विश्‍वास नाखवा, अध्यक्ष,
मल्हारी मार्तंड मच्छिमार सहकारी सोसायटी

रेवस प्रादेशिक अंतर्गत असलेल्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, पाणी येत नसल्याने बोडणी गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावाला टँकरमार्फत पाण्याची सोय करण्यात आली आहे. दर दिवशी एक टँकर उपलब्ध केला जात आहे.

चहल चवरकर, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती
Exit mobile version