। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण पुलाजवळील अंबा नदीपात्रात बुडालेल्या परप्रांतीय ट्रक चालकाचा मृतदेह शोधण्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थाच्या बचाव पथकाला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 21) नागोठणे पोलीस ठाण्यामार्फत सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव पथकाला अंबा नदीपात्रात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शोध व बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली.
नदीपात्रातील पाण्याचा अंदाज घेऊन आणि परिस्थितीचा आढावा घेऊन बचाव पथकाने ‘फ्री स्टाईल सर्च’ तंत्राचा वापर केला. अत्यंत कठीण परिस्थितीतही पथकातील सदस्यांनी जीवाची पर्वा न करता शोधकार्य सुरू ठेवले. त्यांच्या या अथक प्रयत्नांना अवघ्या 15 मिनिटांत यश आले आणि बुडालेल्या ट्रक चालकाचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नागोठणे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. संबंधित परप्रांतीय ट्रक चालकाची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलीस प्रशासन त्याबाबतचा पुढील तपास करत आहे. या कठीण शोध मोहिमेत सहभागी झालेल्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सर्व बचाव कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि व्यावसायिक कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या त्वरित प्रतिसादामुळेच मृतदेह वेळेत शोधणे शक्य झाले.
अंबा नदीपात्रात बुडालेल्या ट्रक चालकाचा मृतदेह सापडला
