असीम मुल्ला ठरला ‘मुरूड श्री’
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड ऐके फिटनेस व मुरुड श्री मेन फिजिक तर्फे ‘मुरूड श्री’चे आयोजन करण्यात आले होते. बजरंगी व्यायाम शाळाचे संस्थापक आशीष खोत यांनी मुरूड समुद्रकिनाऱ्याजवळ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेकरिता मुरूडसह श्रीवर्धन, म्हसळा व रोहा या ठिकाणाच्या एकूण 40 स्पर्धेकांनी भाग घेतला होता. यावेळी ऐके फिटनेस या व्यायाम शाळेचा विद्यार्थी असीम मुल्ला यांनी ‘मुरूड श्री’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला.
या स्पर्धेची सुरुवात मुरूड जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बजरंगी व्यायाम शाळाचे संस्थापक आशीष खोत, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, नगरसेवक रुपेश पाटील, आदेश दांडेकर, आशिल हेदुळकर, रोहा येथील राष्ट्रीय पंच परशुराम चव्हाण, शाम धाटावकर, अलिबाग येथील राष्ट्रीय पंच किरण भगत, मुरूड येथील राष्ट्रीय पंच राजेश गुप्ते, गजानन पाके, माजी राष्ट्रीय पंच मोहन करंदेकर, बाबु ठाकुर आदिंसह चार तालुक्यातील हाजोरो तरुण वर्ग उपस्थित होते. यावेळी मेन फिजिक भारत श्री सुर्वण पदक विजेता बॉबी पाटील यांनी शो पोजिंग देऊन तरूण वर्गाना उत्साहित केले.
या शरीरसौष्ठव स्पर्धेत ऐके फिटनेस या व्यायाम शाळेचा विद्यार्थी असीम मुल्ला यांनी श्री 2026चा ‘मुरूड श्री’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. त्याला 15 हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात आले. तर, द्वितीय क्रमांक नांदगाव येथील अजय दिवकर यांनी पटकाविला असून त्यांना 5 हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात आले. तर, मेन फिजीक विजेता कैफ कारभारी यांना 3 हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकावणारे सुर्या गाणार यांना 2 हजार 500 रुपये व चषक, तर तृतीय विजेता अदित्य किल्लेकर यांना 2 हजार रुपये व चषक देण्यात आले. तसेच, बेस्ट पोझर शुंभम आंबुकर व उगवता तारा म्हणून सुर्या गाणार यांना गौरविण्यात आले.
