| अलिबाग | वार्ताहर |
डॉ. अपेक्षा वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत पुस्तक साथीचे दुसरे वाचनालय पळस ता. रोहा या ग्रामीण व दुर्गम भागात ईला गोरे यांनी सुरू केले. माध्यमिक शाळा पळस इथल्या प्रांगणात वाचनालयाचे उद्घाटन ओठरमल जैन यांनी केले. वाचनालय व ग्रंथालय सुरू करण्यात श्री. राजेश रसाळ यांची मोलाची साथ मिळाली.
ईला गोरे या स्वतः उच्चशिक्षित इंजिनीयर असून त्या मुंबई विद्यापीठातून पीएचडीच्या शेवटच्या वर्षाला आहेत. उद्घाटनाच्या वेळी गोरे यांनी सांगितले की, हे वाचनालय शाळेतील मुलांसाठी, शिक्षकांसाठी, ग्रामस्थांसाठी, गावातील तरुण-तरुणी व इतर इच्छुक यांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा. यावेळी ईला गोरे म्हणाल्या की पीएचडी असे मी उच्च शिक्षण घेत आहे, तसेच याप्रमाणेच गावातील मुलांनाही उच्च शिक्षण घ्यावे व बरोबर इतर पुस्तके वाचली तर ती उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा देतात, संघर्षासाठी बळ पुरवून वाचकांना संघर्ष सज्ज करतात. म्हणूनच ग्रंथ हे गुरु आहेत आणि त्याच बरोबर पुस्तक हा आपला मित्र बनून शेवटपर्यंत संगतसोबत ठेऊन कधी मनोरंजन तर कधी मार्गदर्शन करत जीवनातील निराशा, अपयश दूर करून प्रेरणा व उत्साह निर्माण करणारा स्रोत आहे. म्हणूनच पुस्तकाचे वाचन हा अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतो, असे त्या म्हणाल्या.
यावेळी सरपंच प्रतीक्षा घासे, उपसरपंच भालेकर, ग्रामस्थ व मुख्याध्यापक श्री कृष्णा ठाकूर यांनी या नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रमाबध्दल डॉ. अपेक्षा वेलफेअर फाऊंडेशन व पुस्तक साथी करिता गौरव प्रकट करुन आभार मानले.