विंधन विहिरी पुनर्भरणा ठरतेय जलसंचयनासाठी नवसंजीवनी

सहज सोप्पी पद्धत वेळ व खर्च कमी
अनेकांकडून होतोय अवलंब
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली सुधागडसह जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी मार्चपासूनच अनेक ठिकाणी पाणीटंचाई डोके वर काढते. सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. अशावेळी विंधन विहिरींच्या पाण्याचा वापर वाढतो. एप्रिलनंतर तर या विंधन विहिरींमधील पाणीदेखील कमी होते. मग पाण्याचा मोठा प्रश्‍न उद्भवतो. मात्र, जर या विंधन विहिरींचे पावसाळ्यात पुनर्भरण केले गेले, तर उन्हाळ्यातदेखील पाणी शिल्लक राहू शकते. सध्या जिल्ह्यात अशा विंधनविहीर पुनर्भरणा पद्धतीचा अवलंब अनेक जण करत आहेत. त्यामुळे अनेक विंधन विहिरी पावसाळ्यात रिचार्ज होतात. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी कमतरतेचा प्रश्‍न बर्‍यापैकी मार्गी लागताना दिसत आहे.

जिल्ह्यात काहीजण ही उपयोजना करून घेत आहेत. यावर्षी सुधागड तालुक्यात सिद्धेश्‍वर गावाजवळील फार्महाऊस मध्ये, तर मागील वर्षी कुंभारघर येथे एका विंधन विहिरिला अशा प्रकारे ही पद्धत वापरण्यात आली. तर महागावला देखील काही ठिकाणी ही उपाययोजना करण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्भरणा करण्यासाठी बहुतांश लोकांनी ही कमी खर्चीक व सोप्पी पद्धत अवलंबली आहे. अनेकांनी ही पद्धत वापरली तर पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करता येईल व जलसंवर्धन आणि संचयनदेखील होईल.

अशी करा विंधनविहीर रिचार्ज
सुरुवातीस विंधनविहिरीच्या बाजूला 4 फुट खड्डा खणायचा. विंधन विहिरीच्या मोकळ्या पाईपला ड्रिल मशिनने होल मारून घेणे. त्यावर जाळी गुंडाळून नंतर त्यावर काथ्या गुंडाळावा. नंतर खड्ड्यात मोठे दगड त्यावर विटांचा चुरा त्यांनतर बारीक खडी त्यावर बारीक वाळू असे थर अंथरावे. वरुन 6 इंच खड्डा रिकामा ठेवावा. त्यामुळे पावसाचे पाणी गाळून आत जाईल व जलस्तर वाढेल. यात पावसाळ्यात कोसळणारे छप्पराचे पाणीसुध्दा गाळून सोडता येते. या सगळ्यासाठी अवघा 2-3 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे ही पद्धत कमी खर्चिक, अत्यंत सोप्पी आणि सहज करता येणारी आहे.

जमिनीतील पाणीसाठा वाढवायला अशा उपायोजना करणे गरजेचे आहे. बोरवेलबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील यामुळे वाढते. अधिक लोकांनी ही पद्धत वापरावी व पाण्याचे संवर्धन करावे. यासाठी परवडणार्‍या दरात ही सुविधा उपलब्ध करून देत आहे.

अमित निंबाळकर, विंधनविहीर पुनर्भरणा तज्ज्ञ, पाली
Exit mobile version