बोर्ले-जिते रस्त्याचे काम थांबले; ग्रामस्थ हैराण

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-कशेळे या भीमाशंकर राज्यमार्ग वरील बोर्ले गावापासून जिते गावापर्यंत अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाची मुदत संपल्यानंतर देखील रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, रस्त्याच्या कामासाठी खोदलेला रस्ता, पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मोऱ्याची अर्धवट कामे यामुळे जिते ग्रामस्थ हैराण आहेत.

नेरळ-कशेळे या भीमाशंकर राज्य मार्ग येथून बोर्ले गाव आणि पुढे जिते गावापर्यंत रस्ता एप्रिल 2021 रोजी मंजूर झाला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मधून हे रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ग्रामविकास तसेच जलसंधारण विभाग यांच्याकडून केले असून, ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यकारी अभियंता यांचे या कामावर नियंत्रण आहे. मात्र या अडीच किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यात 14 ठिकाणी पाईप मोऱ्या टाकण्यात येणार होत्या. तर रस्त्यावर मुरुम मातीचा थर टाकून त्यावर जीएसबी चा माल टाकून झाल्यावर खडीकरण आणि नंतर खादी टाकून रोलर फिरविण्याची कामासाठी 2 कोटी 28 लाखांचा मंजूर होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाचे कार्यादेश नवी मुंबईत येथील श्री सिद्धिविनायक कंन्स्ट्रक्शन कंपनीने मिळविले होते. रस्त्याचे काम निर्धारित वेळेत सुरु झाले आणि त्यामुळे रस्त्याचे काम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण होणार असे स्थानिक ग्रामस्थांना वाटले होते. मात्र मुदत समावून 10 महिन्यांचा कालावधी लोटला तरी रस्त्याचे पूर्ण झाले नाही.

रस्त्याच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या पाईप मोरीचे काम अद्याप अर्धवट आहे. तर रस्त्यातील 2200 मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण काम अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालक यांची गेली दोन वर्षाहून अधिक वर्षे अन्य रस्त्याने जाण्याची सुरु असलेली कसरत थांबलेली नाही. रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून मागील दोन वर्षात अनेक कार्यक्रम जिते गावात झाले. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने पाहुण्यांना आणि स्थानिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्या रस्त्याचे काम गेली आठ महिने पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यात रस्त्याचा ठेकेदार स्थानिकांवर दबाव टाकण्याचे काम करीत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. तर रस्त्याच्या कामातील 300 मीटर लांबीच्या सिमेंट आरसिसी काँक्रिटकरण कामाचे तीनतेरा वाजले आहेत. काँक्रिट काम जेमतेम 15 टक्के एवढे झाले असल्याने स्थानिकांची वाहने ये-जा करू शकत नाहीत. तर रस्त्याचे काम अर्धवट ठेवून ग्रांमस्थ यांना त्रासात टाकणार्‍या ठेकेदारावर कारवाई करावी, शासनाने त्या ठेकेदार कंपनीला केलेल्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी ग्रामस्थ विजयबुवा घरत केली आहे.

रस्त्याच्या मागील वर्षी निधी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे कामला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रस्त्याचे डांबरीकरणामधील कार्पेट आणि सिलकोट बाकी असून पाईप मोर्‍यांचे हेड वॉल बसविण्याचे काम शिल्लक आहे. त्याचवेळी याच महिन्यात कामला सुरुवात होईल आणि फेब्रुवारी अखेर पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील.

राहुल चौरे, शाखा अभियंता
Exit mobile version