येसदे, साळाव, सुरई डोंगरावरुन पाण्याचे लोंढेच लोंढे
रेवदंडा | महेंद्र खैरे |
मुरूड तालुक्यात येसदे, साळाव, सुरई परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने परिसराला चांगलेच झोडपून काढले. बोर्ली बाजारपेठेत या पावसाचे पाणी शिरल्याने पूर्ण बाजारपेठच जलमय होऊन गेली.त्यामुळे व्यापार्यांचे अतोनात नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे रात्रीचे सुमारास दरड कोसळली,तर येसदे ते शिरगाव या मुख्यः रस्त्यावर पाणी व माती यांचे चिखल तयार झाले होते.
मध्यरात्री पावसाचे थैमान
शिरगाव ते बोर्ली या मुख्यः रस्त्यावर प्रचंड वेगात पाणी डोंगरातून मातीसह येऊन समुद्राकडे जात होते. त्यामुळे सर्वत्र मुख्यः रस्त्याला चिखलाचे साम्र्राज्य निर्माण झाले होते. रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत पावसाने या परिसरात थैमान घातले होते. परिसरात लाईट गेल्याने व मोबाईल टॉवर संपर्क तुटल्याने बाहेरील लोकांशी संपर्क करणे कठीण झाले होते. पहाटे चार ते पाच वाजता पावसाने दडी मारली परंतू डोंगरातून येत असलेले पाणी व मातीचे मिश्रण दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होते. या ठिकाणी मुख्य रस्ताने वाहतुक करणे सुध्दा कठीण होते, परंतू वाहतुकीस अडथळा नसल्याने साळाव-रोहा व साळाव-मुरूड रस्तावरील वाहतुक सुरळीत सुरू होती.
चेकपोस्ट नाक्यावर दरड कोसळली
साळाव चेकपोस्ट नजीक मुख्यः रस्त्यालगतच्या डोंगरातून रात्री अकराचे सुमारास डोंगरातील माती वाहत्या पाण्यासह वाहत आल्याने साळाव चेकपोस्ट-रोहा, व साळाव चेकपोस्ट ते मुरूड रस्ता बंद झाल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाला होता. यावेळी येथील साळाव चेकपोस्ट पोलिसांनी तात्काळ रेवदंडा पोलिस ठाण्याशी संपर्क केला, रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक थोरात, उपनिरीक्षक विनोद चिमडा, मुरूड तहसिलदार गोविंद वाकडे, नायब तहसिलदार रविंद्र सानप, तसेच रेवदंडा पोलिस ठाणे अंमलदार तातडीने घटनास्थळी हजर झाले. साळाव जेएसडब्लू कंपनीच्या जेसिबीच्या सहाय्यांने रस्तावर आलेली माती बाजूला करून दोन्ही बाजूकडील मार्ग वाहतुकीस खुले केले. शिरगाव नजीकच्या येसदे डोंगरातून सुध्दा अतिवृष्टीने मोठया प्रमाणात पाणी डोंगरातून मातीसह वाहत आल्याने मुख्यःरस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले होत
बोर्ली बाजारपेठ जलमय
अतिवृष्टीने सुरई डोंगरातून निघालेले पाणी चक्क बोर्ली बाजारपेठेत घुसले, बोर्ली बाजारपेठेत अंदाजे सहा फुट पाण्याची पातळी गाठली वेगाने प्रवाह सुरू होता असे येथील प्रत्यक्षदर्शी प्रगती झेरॉक्सचे दुकानदार संदिप चिरायू यांनी सांगितले. बोर्ली बाजारपेठेतील सर्वच दुकानात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला, दुकानातील फ्रीज इलेक्ट्रीक उपकरणे, झेरॉक्स, तसेच फोटोग्राफी व्यावसायीकांचे प्रिंटर, झेरॉक्स मशीन आदीचे विपुल नुकसान झाले, येथील हॉटेल व्यावसायीकांना नुकसानीचा जबर फटका बसला आहे, तर किराणा मालाचे दुकानातील धान्य, कडधान्य, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनाश्यक वस्तूचा पुरते नुकसान झाले.
रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याची पातळी सहा फुटावर होती, त्यानंतर पावसाचा ओघ कमी झाल्याने पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. दरम्यान बोर्ली बाजारपेठची पुरती वाताहत होऊन उध्वस्त झाल्याचे चित्र आहे. बोर्ली गावाचे परिसरात अनेक ठिकाणी भराव झाल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, व मुख्यः रस्त्यावर असलेले गटाराची साईज अगदीच छोटी केल्याने पाणी जाण्यासाठी मार्गच नव्हता, तसेच ठिकठिकाणी पाणी जाण्याचा मार्गात अनेक बांधकामे नव्याने झाल्याने बोर्ली बाजारपेठेवर हा प्रसंग ओढवला असल्याची तक्रार येथील व्यापारीवर्ग करत होता.