निवारा शेड वादाच्या भोवर्यात; गावकर्यांचा आंदोलनाचा इशारा
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बोर्लीपंचतन येथे सुसज्ज बसस्थानक व्हावे आता सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र, याच समाजहितार्थ कामाला आता धनदांडग्यांचा विरोध होत आहे. परंतु हा डाव हणून पाडण्यासाठी येथील ग्रामस्थ एकवटले असून पुढे बसस्थानकाच्या उभारणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बोर्लीपंचतन शहरात 2021 मध्ये अतिक्रमनावर कारवाई करण्यात आली. आजमितीस या घटनेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत मार्फत निवारा शेडसाठी जून्या बसस्थानकाच्या मोकळ्या भूखंडात बांधकामाची परवानगी मिळावी. तसेच राज्य परिवहन महामंडळाने समन्वय साधावा यासाठी मागणी करण्यात आली. तसा ठराव ही मंजूर करण्यात आला. त्यानुसार पुढे सबंधित विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रशासनाकडून कामाला मंजुरी मिळाली. पुढील बसस्थानकाचा प्रश्न सोडवण्यासाठी सोमवारी तारीख 3 रोजी सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीने सभा घेण्यात आली.
आज दोन वर्षाच्या संघर्षानंतर सर्वसामान्य जनतेला निवारा शेड मिळण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न पूर्ण होत आहेत. यासाठी लोकवर्गणीतून बसस्थानकाची उभारणी करण्यात येईल. असा एकमताने यावेळी निर्णय घेण्यात आला. मात्र, या मोकळया भूखंडावर बसस्थानक होऊ नये म्हणून आता चार चौघांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यांच्याकडून सरकारी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण सुध्दा करण्यात आले. त्यामुळे आता या जागेवरील अतिक्रमण लवकरच हटवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नाहीतर बसस्थानकाचा प्रश्न सोडवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वानुमते यावेळी देण्यात आला. एसटीसाठी तासनतास उन्हातान्हात वाट बघत उभा राहणार्या जनमानसातील आबालवृद्धांसह चिमुकल्या प्रवासीवर्गाची झळ येथील आलिशान गाडीतून फिरणार्या बाबूंना काय कळणार. त्यामुळे बसस्थानकासाठी यांचा विरोध होत आहे.