| नेरळ | प्रतिनिधी |
राज्यातील निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. मात्र शैक्षणिक कामे सोडून निरक्षर लोकांचे सर्वेक्षण आणि अशैक्षणिक कामे करण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने विरोध केला आहे.
अशैक्षणिक कामे आणि निरक्षरांचे सर्वेक्षण ही कामे शिक्षक वर्गावर सोपविण्यात आली आहेत. शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या आदेशात सर्व शिक्षकांना त्याच्या हद्दीतील निरक्षर लोकांची नोंद करायची असून निवडणूक पूर्व कामे देखील शाळेच्या व्यस्त कामात करायची आहेत. मात्र शासनाच्या या धोरणात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी विरोध केला आहे. शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष अभ्यंकर यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून शिक्षक सेनेचा या अशैक्षणिक कामास तसेच निरक्षर लोकांचे सर्वेक्षण करण्यास शिक्षक सहकार्य करणार नाहीत असा विरोध केला आहे. शिक्षक सेनेने राज्याचे शिक्षक आयुक्त सूरज मांढरे यांना दिलेल्या पत्रात अशैक्षणिक आणि निरक्षर सर्वेक्षण ही कामे शिक्षक सेनेचे सदस्य करणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. तसेच शासनाच्या या दोन्ही कामांवर शिक्षक सेनेचा बहिष्कार असल्याचे जाहीर केले आहे अशी माहिती शिक्षक सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष संतोष कांबरी यांनी प्रसिद्धीस काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.