प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात हत्या

| वसई | प्रतिनिधी |

वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रियकराने लोखंडी पान्याने मारून प्रेयसीची हत्या केली. प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला होत असताना अनेक लोक फक्त बघतच राहिले. या भयंकर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईत प्रियकराने प्रेयसीचा भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित यादव असे आहे. प्रेयसी आणि प्रियकर गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात या प्रियकराने भररस्त्यात लोखंडी पाना मारण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने या प्रियकराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती संतापलेल्या प्रियकराला रोखू शकला नाही. या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला सुरुच ठेवला. या हल्ल्यात या तरुणीचा मृत्यू झाला आहे. हत्या करताना घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या तरुणीला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सुषमा अंधारे 
सुषमा अंधारे म्हणाल्या की, वसईमध्ये भररस्त्यात एका तरुणीची हत्या झाली असून काळजाची थरकाप उडवणारी ही घटना आहे. दिवसाढवळ्या तरुणीची ही हत्या झाली आहे. तरुणीच्या हत्येवेळी लोक बघत होते, हे सर्व चित्र विदारक आहे. मुंबई शहराजवळ घटना घडते. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानीजवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.'
Exit mobile version