ब्राह्मण सभेचा वर्धापनदिन संपन्न

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेचा 18 वा वर्धापनदिन या निमत्ताने रामभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामधे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैदिक मंत्रोच्चारात दीपप्रज्वलन आणि परशुराम प्रतिमेचे पूजन सभेच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर शाळकरी मुलींनी आचार्य तुलसीदास यांच्या पदावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. नंतर संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या पार्श्‍वभूमीवर रामभक्तीपर गीते हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. सभासद कलाकारांनी रामताण्डव स्तोत्र, विविध संतांचे रामभक्तिपर अभंग, भावभक्तीपर गीते आणि गीतरामायणातील गाण्यांचे सादरीकरण केले. प्रतिभा कुलकर्णी व अथर्व देव यांनी संवादिनीसाथ, समीर सोमण व आदित्य उपाध्ये यांनी तबलासाथ, प्रसाद जोशी व नेहा जोशी यांनी तालवाद्य साथ केली. किरण गोखले यांनी ध्वनिसंयोजन केले. जयश्री ताह्मनकर आणि रीना मिनासे यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रम अभिरुचीपूर्ण ठरला. संस्थेच्या अध्यक्ष दीपाली जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीपाद वैशंपायन यानी आभारप्रदर्शन केले. ’युवोन्मेष’ समूहाने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

Exit mobile version