मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वादाच्या भोवऱ्यात

नागोठण्याच्या पुलाची दुरुस्ती लांबणीवर; आयआयटीच्या विभागाकडून अहवालाची प्रतीक्षा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील उड्डाण पुलाला भगदाड पडून अनेक महिने उलटले, तरी पुलाच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पुलाची पाहणी आयआयटीच्या तांत्रिक विभागाने करूनही त्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाला अद्याप प्राप्त झालेला नसल्याने दुरुस्तीचे काम लांबणीवर गेले आहे. गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना पुलावरील वाहतूक बंद असल्याने सर्व भार खड्ड्यांनी पोखरलेल्या सर्व्हीस रस्त्यावर आला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि बोरीवलीहून मोठ्या संख्येने चाकरमानी रायगड, रत्नागिरीकडे रवाना होणार असल्याने ऐन उत्सवाच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी चारपदरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या कामाला तब्बल 18 वर्षे होत आली तरी अनेक ठिकाणी महामार्गाशी संबंधित समस्या कायम आहेत. पावसाळ्यात महामार्गावरील अनेक भागांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पळस्पे ते कासू हा 42 किलोमीटरचा पहिला टप्पा, तर कासू ते इंदापूर हा 42 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, नागोठणे येथील पुलाच्या दुरवस्थेने या दाव्यापुढे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

नागोठणे येथील उड्डाण पूल खचल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी पुलाखालील सर्व्हीस रस्ता पर्यायी मार्ग म्हणून खुला करण्यात आला आहे. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होत नसल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सर्व्हीस रस्त्यावर वाहनांचा मोठा ताण निर्माण झाला आहे. या मार्गावर हलक्या वाहनांसह अवजड वाहनांचीही ये-जा सुरू असल्याने आधीच खराब झालेल्या रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

सर्व्हीस रस्ता अवजड वाहनांचा भार सहन करण्याच्या क्षमतेचा नसतानाही त्यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून सुरू करण्यात आलेल्या सर्व्हीस रस्त्यावरच आता वाहतूक व्यवस्थेचा ताण वाढला आहे.

खचलेल्या पुलाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्ती रखडलेली आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयआयटीच्या तांत्रिक विभागाकडून पाहणी करण्यात आली. मात्र पाहणी होऊनही पुलाच्या दुरुस्तीबाबतचा तांत्रिक अहवाल अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्त झालेला नाही. अहवालाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीचे काम रखडल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा लोंढा; कोंडीची धास्ती
यंदा 14 सप्टेंबर रोजी घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, बोरीवली, ठाणे परिसरातील चाकरमानी मोठ्या संख्येने रायगड आणि रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत. गणेशमूर्तींचे आगमन, सजावट आणि स्वागताची तयारी करण्यासाठी काही चाकरमानी आठवडाभर आधी, तर काही जण दोन-तीन दिवस अगोदरच गावाकडे निघतील. सध्या नागोठणे पुलाऐवजी सर्व्हीस रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावतो. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पुलाची दुरुस्ती उत्सवापूर्वी पूर्ण झाली नाही, तर चाकरमान्यांसह गणेशभक्तांना या मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
प्रशासनाची कसोटी
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढणार हे निश्चित असताना नागोठणे पुलाची दुरुस्ती अद्याप अहवालाच्या प्रतीक्षेत राहणे, ही बाब चिंताजनक ठरत आहे. एका बाजूला पुलाची दुरवस्था, दुसऱ्या बाजूला खड्ड्यांनी व्यापलेला सर्व्हीस रस्ता आणि त्यावर वाढणारा वाहनांचा ताण यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेची अक्षरशः कसोटी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाच्या दुरुस्तीबाबत तातडीने निर्णय घेऊन काम मार्गी लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नागोठणे येथील पूल खचला आहे. पुलाची आयआयटी विभागाकडून पाहणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाची दुरुस्ती सुरू केली जाईल. दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येणार आहेत.

शैलेंद्र गुंड,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विभाग

नागोठणे येथील पुलाची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे सर्व्हीस रस्त्यावर वाहतुकीचा मोठा भार पडला आहे. या ठिकाणी वाहतूक मंदावते. याबाबत संबंधित विभागाला पत्र देण्यात आले असून, पुलाची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीची समस्या दूर करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मारुती आंधळे,
पोलीस निरीक्षक
Exit mobile version