ट्रेलरच्या धडकेने पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला

उरण-पनवेल मार्गाववरील घटना; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

। उरण । प्रतिनिधी ।

उरण-पनवेल महामार्गावरील चिर्ले जवळील नागाव फाटा येथे काल बुधवारी (दि.25) सकाळी 10.30 च्या सुमारास उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सपोर्ट स्ट्रक्चरला एका भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे पुलाचा जड लोखंडी सांगाडा थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र उरण परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

चिर्ले (नागाव) येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्याला एका ट्रेलरने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, लोखंडी स्ट्रक्चर थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर चालकाने एटीएममधून पैसे काढण्यासाठी गाडी उभी केली होती. परंतु, हॅन्ड ब्रेक निसटल्याने अवजड ट्रेलर उतारावरून पुढे सरकला आणि थेट पुलाच्या लोखंडी बांधकामात शिरला. चालकाचा ताबा नसलेला हा ट्रेलर वेगाने धडकल्याने हा अपघात घडला. या धडकेत ट्रेलरचा एक्सेल बार तुटून मोठे नुकसान झाले आहे. तर पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने क्रेनच्या साहाय्याने पडलेले लोखंडी खांब बाजूला केले असून, आता हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. उरण आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक आता सुरळीत सुरू आहे.

Exit mobile version