विजय विकास सामाजिक संस्था, मॉर्निंग वॉक ग्रुपचा पुढाकार
| उरण | वार्ताहर |
रोजगाराच्या शोधात असलेल्या नवतरुणांचे पुढील भविष्य प्रकाशमय व्हावे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. पोलीस भरतीसाठी मैदान स्वच्छ व सुंदर असावे. तरुणांना मैदानावर योग्य रित्या सराव करता यावा या दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जपत विजय विकास सामाजिक सामाजिक संस्था उरण व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर विद्यालयाच्या मैदानात असलेली झाडी झुडपे काढून साफसफाई करून मैदान स्वच्छ व सुंदर करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशांत पाटील यांना फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या मैदानात पोलीस भरतीचे सराव व मार्गदशन विद्यार्थ्यांना करायचे होते. मात्र, मैदानावर सर्वत्र गवत, झाडीझुडपी असल्याने येथे सराव करता येत नव्हता. ही समस्या शिक्षा अकॅडेमीचे संचालक व प्रशिक्षक प्रशांत पाटील यांनी विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या कानावर टाकली. लगेचच ही समस्या विजय भोईर यांनी विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांना सांगितली. त्यानंतर सर्वांनी हातात झाडू, मशीन, अवजारे घेऊन परिसराची साफसफाई केली. विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी जि.प. माजी सदस्य विजय भोईर, फुंडे कॉलेजचे प्रा. प्रल्हाद पवार, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सुदीप पाटील, विकास ठाकूर, भरत मढवी, अॅड. भार्गव पाटील, नंदकुमार तांडेल, संदीप तांडेल, प्रशांत पाटील, जितेंद्र ठाकूर, जनु भोईर, दर्शना माळी, विकास भोईर, महेश थळी आदींनी मैदान परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.