स्थानिक आमदार ठरले निष्क्रीय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे स्थानिक आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना देखील निष्क्रीय असल्याने जिल्ह्यातील रुग्णसेवा खडतरच ठरली आहे. शिंदे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सेवा रामभरोसे ठरली आहे. गेल्या सात महिन्यात जिल्हा रुग्णालयात 49 बालके दगावल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. दरम्यान, आमदारांच्या निष्क्रीयतेवर पांघरुण घालण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाऊन आमदारांच्याच बगलबच्च्यांनी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आज केला. याबाबत जनतेतून मात्र सत्तेत सहभागी असताना स्टंटबाजी करण्याची वेळ का येते असा सवाल केला जात आहे.

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. वारंवार लक्ष वेधून देखील राज्य सरकाचे आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यातच डॉ विक्रमजीत पडोळे आणि डॉ राजीव तांबाळे यांच्या बदल्या होऊन तीन महिने झाले तरी त्यांच्या जागी नवीन डॉक्टरांची नियुक्ती आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था कंंत्राटी आणि शिकाऊ डॉक्टरांच्याच खांदयावर आहे. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने कृती करण्याची गरज आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नांबाबत शेकापचे आ जयंत पाटील यांनी वारंवार विधानपरिषदेत आवाज उठविला आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार पंडित पाटील तसेच महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले आहे. याउलट स्थानिक आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असताना देखील त्यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही ठोस कृती झालेली नाही.

एवढेच काय आतापर्यंत एक दोन कार्यक्रम सोडले तर आमदारांनी जनतेच्या प्रश्नांसाठी जिल्हा रुग्णालयाची पायरी देखील चढलेली दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या बगलबच्च्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन स्टंटबाजी करुन आपल्याच आमदारांच्या निष्क्रीयतेचे दर्शनच घडवले असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा रुग्णालयात सर्जन, भुलतज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ असे वर्ग एक चे 80 टक्के पदे रिक्त आहेत. बाह्यरुग्ण संपर्क, निवासी वैद्यकिय अधिकारी अशी अनेक महत्वपूर्ण पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाला थेट मुंबईत हलविण्याचाच सल्ला दिला जातो. त्यामुळे डॉक्टरांची रिक्त पदे त्वरीत भरण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. स्वच्छता, बांधकाम, असे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

रोज मोठया प्रमाणात प्रसृतीसाठी जिल्हा रुग्णालयात गरोदर महिला येत असतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार वेळेत होत नाहीत. त्यामुळे प्रशासनाला खाजगी डॉक्टरांना कंत्राटी स्वरुपात नेमावे लागते.
सात महिन्यात 49 बालके दगावली
जिल्हा रुग्णालयात गेल्या सात महिन्यात 49 बालके दगावली आहेत. एप्रिल महिन्यात 13, मे 7, जुन 7, जुलै 4, ऑगस्ट 6, सप्टेंबर 8 तर ऑक्टोंबर 4 अशा एकुण 49 बालकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचप्रमाणे उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने गेल्या काही महिन्यात अनेक रुग्णांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहे.