| सुकेळी | वार्ताहार |
सद्यपरिस्थितीत अवकाळी पावसाने सर्वच ठिकाणी कहर माजवला आहे. रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधील हेदवली गावातील घनश्याम साळवी यांचा गुरांचा गोठा रविवार (दि.25) रोजी अचानक आलेल्या वादळाने जनावरांच्या अंगावर कोसळून या दुर्घटनेत एका बैलाचा बळी गेला. त्यामुळे शेतकरी घनश्याम साळवी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेदवली येथील शेतकरी घनश्याम साळवी यांनी रविवारी आपली जनावरे नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधली होती. मात्र, रविवारी रात्री अचानक आलेल्या पाऊस व वादळामुळे साळवी यांचा गोठा वाऱ्याच्या प्रचंड वेगाने जनावरांच्या अंगावर कोसळला. यामध्ये एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य नऊ जखमी झालेल्या जनावरांना हेदवली ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेत साळवी यांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऐन भात पेरणीच्या वेळेसच एका बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी साळवी हे आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबतीत शासनाने त्वरित पंचनामा करुन साळवी यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी बळीराजा शेतकरी सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल लाड व ऐनघर विभाग करत आहेत.