| मुंबई | प्रतिनिधी |
पुढील 3-4 तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीममधील इमारतीचा भाग कोसळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल स्टेशन परिसरातील तिकीट काउंटरजवळ पाणी साचले. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना स्टेशनवर पोहोचण्यासाठी भिंतीवर चढून जावे लागते. अंधेरी सबवे बंद आहे. हा अंधेरी पूर्व ते अंधेरी पश्चिम, वर्सोवा, सात बंगले, चार बंगले, आंबोली, जुहू, जोगेश्वरी पश्चिम यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. त्या सर्वांमध्ये 2 ते 2.5 फूट पाणी भरले आहे. लोकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी, मोटर पंप वापरून पाणी काढले जात आहे. वाहतूक पोलीस लोकांना थांबवत आहेत आणि परत पाठवत आहेत. तर आता इमारतीचा भागही कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माहीममधील पितांबर लेन परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला आहे. हाजी कासम या इमारतीचा भाग कोसळल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच एनडीआपएफचे पथक पोहोचले आहे. या घटनेतील जिवीतहानीची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.