पुलाच्या कामाबाबत ग्रामस्थ आक्रमक
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाजने-बेलोशी मार्गावरील पुलाचे काम वेळेवर न झाल्याने या गावांचा पावसामुळे संपर्क तुटला. ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तहसिलदरांकडे तक्रार करीत महाजने – बेलोशी मार्ग मोकळा करण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिले. त्यानंतर बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना केली.
अलिबाग तालुक्यातील महाजने-बेलोशी या गावांना जोडणारा पूल जुना होता. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केले. जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्यात आला. सुमारे 78 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. नवीन पूलाचे काम मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले. मात्र, काम योग्य पद्धतीने होत नसल्याने काही ग्रामस्थांनी आवाज उठवला. ही बाब जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह अलिबागचे अभियंता यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर अभियंता राहुल शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामे योग्य पद्धतीने करण्याची सूचना केली. मे महिन्याच्या आत काम होण्याची अपेक्षा होती. मात्र, संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे महाजने-बेलोशी येथील नागरिकांना पर्यायी कच्च्या रस्त्याचा आधार घ्यावा लागला.
मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसात महाजने नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. कच्चा रस्ता बंद झाला. अत्यावश्यक सेवाही ठप्प झाली. महाजने – बेलोशी गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पुलाच्या अपूर्ण व कूर्म गतीने सुरू असलेल्या कामाचा फटका प्रवासी विद्यार्थी, रुग्ण व उन्हाळी सुट्टीत गावी आलेल्या नागरिकांना बसला. पुलाचे काम वेळेत न झाल्याने अवकाळी पावसात नदीला पूर आला. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला.
या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल देवांग, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर पाटील, बेलोशीचे माजी सरपंच कृष्णा भोपी, रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, नायब तहसिलदार टोळकर, तलाठी शशिकांत कांबळे, ग्रामपंचायत व महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाची आणि पर्यायी रस्त्याची पाहणी केली. ग्रामस्थांसोबत चर्चा केली. त्यावेळी ठेकेदाराच्या मनमानी आणि सुस्त कामाबाबत नाराजी व्यक्त करीत तहसिलदारांकडे तक्रार केली. तातडीने येण्या-जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी बांधकाम अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. पूलाचे काम तातडीने सुरु करून पूल वर्दळीसाठी मोकळा करा, अशा सूचना केल्या. यावेळी महाजने ग्रामस्थ, तरुण मंडळी उपस्थित होते.