घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या दिवसा घरफोडीच्या गुन्ह्याचा खांदेश्वर पोलीस ठाण्याने अवघ्या 36 तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 15 ग्रॅम सोन्याचे व 52 ग्रॅम चांदीचे दागिने, अंदाजे 1,56,950 रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास करण्यात आला.

या प्रकरणात रफीक माजिद शेख (35), मोहम्मद बिलायत अब्दुल रहिम खान (30) आणि शकील रुहैल शेख (30) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपी मुंबईतील विविध भागात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version