पनवेलमधील घरफोडीचा गुन्हा उघड

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टपालनाका परिसरात झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुर्ला, मुंबई येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 7 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तक्रारदार प्रमोद जोरी रा. टपालनाका, पनवेल यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील 8,12,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 90,000 रुपये रोख रक्कम, असा एकूण 9,02,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक पी.एस.आय. विनोद लभडे, पो. हवा. अविनाश गंथडे, पो. हवा. योगेश दिवेकर, पो. हवा. परेश म्हात्रे, पो. ना. सम्राट डाकी, पो. ना. विनोद देशमुख, पो. शि. किरण कराड आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, कमरुद्दिन सलाउद्दीन शेख (45) रा. टॅक्सीमन कॉलनी, कुर्ला, मुंबई याला ताब्यात घेतले असता तपास दरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 7,22,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Exit mobile version