| पनवेल | वार्ताहर |
घरफोडी करणार्या चोरट्यांनी कळंबोलीतील खिडूकपाडा येथे राहणार्या कमलाकर पाटील यांचे घर फोडून त्यांच्या घरातील सुमारे चार लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे.
कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. खिडुकपाडा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर रहाणारे कमलाकर पाटील (65) यांनी सुधागड पाली येथे शेतीसाठी जमीन घेतल्याने ते पत्नीसह शेती करण्यासाठी गेले होते. यादरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, शेजारी राहणार्या कमलाकर पाटील यांच्या मुलाला सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने याबाबतची माहिती वडील कमलाकर पाटील यांना दिली. त्यानंतर त्यांनी पत्नीसह आपल्या घरी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.