| रसायनी | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून पूर्णतः प्लास्टिक बंदीचा संकल्प शासनाचा असला तरी खालापुरात मात्र भंगार व्यवसाय प्रशासनाला जुमानत नसून, अनधिकृतपणे नगर पंचायत हद्दीत प्लास्टिक साठा करणे सुरूच ठेवले आहे. शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि इंग्लिश शाळेच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत भंगार व्यावसायिकाने जागा घेतली आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून टेम्पोतून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा आणण्यात येत आहे. हा कचरा तालुक्यासह आसपासच्या कारखान्यांतून आणण्यात येतो. या कचर्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. अनधिकृतपणे प्लास्टिकचा साठा करण्यात येत असून, नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी या व्यावसायिकाने घेतलेली नाही. साठा करत असलेल्या ठिकाणापासून लोकवस्ती जवळ आहे, त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो. जागरुक नागरिकाने नगरपंचायत इकडे तक्रार केली होती. नगरपंचायतीने सदर भंगार व्यावसायिकाला बोलावून कचरा तातडीने हटविण्यास सांगितले होते. परंतु, भंगार व्यावसायिकाने नगर पंचायतीला जुमानत नसल्याचे दाखवत दिवसाढवळ्यादेखील कारखान्यातील वेस्टेज प्लास्टिक साठा करणे सुरूच ठेवले आहे. दुकानदाराकडे प्लास्टिक पिशवी सापडल्यास दंडात्मक कारवाई करणार्या प्रशासनाला कारखान्यातून येणार्या प्लास्टिक साठ्यावर कारवाई करताना डोळेझाक होत आहे.
दंडाचे फलक नावालाच
अगोदर दिवस मावळताना टेम्पो येत असून, दिवस उजाडण्या आधीच कचरा खाली केला जात असे. नगरपंचायतीने दर्शनी भागात अनधिकृत प्लास्टिक साठा करणार्यावर 25,000 दंडाची कारवाई असे फलक लावलेले आहे. ते फलक नावापुरते असून, कारवाई मात्र होत नसल्याने नक्की कोणाचे हात बांधले याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
- नगरपंचायत येथील अनुभवी अधिकार्यांना पाठवून काय कारवाई करता येईल याचा आढावा घेऊ. – सुरेखा भणगे शिंदे, मुख्याधिकारी, खालापूर