| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूण शहरातील राधाकृष्ण परिसरात तब्बल 9 सदनिका चोरट्याने फोडण्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.23) रात्री खेंड विभागात चोरट्याने दोन सदनिका फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. सलग दोन दिवसांत चोरट्यांनी सदनिका फोडल्याने चिपळूणमध्ये चोरटे सक्रिय झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. या चोऱ्यांच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा उठवत शहरातील राधाकृष्णनगर परिसरातील तब्बल 9 सदनिका चोरट्याने फोडल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा चोरट्याने खेंड विभागातील दोन सदनिका फोडल्याची घटना समोर आली आहे. खेंड कांगडेवाडी रोड परिसरात असलेल्या हरिदर्शन बिल्डिंग आणि लक्ष्मी वैभव बिल्डिंग या दोन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका फोडल्या आहेत. हरिदर्शन बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रमोद धामणस्कर यांच्या बंद सदनिकेचा दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. मात्र, कपाटामध्ये कपड्याव्यतिरिक्त काहीही सापडले नाही. लक्ष्मी वैभव बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या सुजित मांगडे यांच्या सदनिकेमधून सोन्याची अंगठी, कानातले दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना केल्या. मात्र, सलग दोन दिवस झालेल्या सदनिका फोडीमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान असणार आहे.