दीड लाखांचे नुकसान
| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूण तालुक्यात गुरुवारी (दि.22) झालेल्या वादळी पावसामुळे देवपाट येथील घरावर, तर कामथे येथील शौचालयावर झाड पडून सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु, शनिवारपासुन पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. सध्याचा अवकाळी व येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या नियमित पावसाचा विचार करता येथील तहसीलदार कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष 26 मेपासून सुरू होणार आहे.
तालुक्यात गुरुवारी सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे देवपाट येथील पांडुरंग दुर्गोली व दीपक दुर्गोली यांच्या घरावर कलमाचे झाड पडले. त्यांत त्यांचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचा वीरच्या तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. तसेच, कामधे सिद्धार्थनगर येथील बाबू जाधव यांच्या घराशेजारील शौचालयावर कलमाचे झाड पडल्याने त्यांचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचाही संबंधित तलाठ्यांनी पंचनामा करून आपला अहवाल तहसीलदार कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच, असुर्डे-कुटरे रस्त्यावरील पुलाला असलेल्या जोडरस्त्यावरून पाणी वाहत असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
रामपूर मंडळात अधिक पाऊस
गुरुवारी तालुक्यात 99.22 मि. मी. पाऊस पडला असून त्यात चिपळूण मंडळात 105, खेर्डी-102, वहाळ-125, कळकवणे-40, मार्गताम्हाणे-106, शिरगांव-69, रामपूर-103, असुर्डे 110, सावर्डे-133 मि.मी. अशी नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार रामपूर मंडळात अधिक तर कळकवणे मंडळात सर्वात कमी पाऊस पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत तालुक्यात 179.65 मि.मी. पाऊस पडला आहे. सध्याचा अवकाळी पाऊस व काही दिवसात सुरू होणारा नियमित पाऊस या पार्श्वभूमीवर 26 मेपासून तहसीलदार कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे.