माणगावात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी; 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून पसार

। माणगाव । प्रतिनिधी ।
बंद घराचे कोणत्यातरी हत्याराने कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून तो पसार झाला आहे. सदरील घटना दि.12 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता ते दि.23 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरामध्ये निजामपूर रोड, अमित कॉम्प्लेक्स, माणगाव आर 1, बिल्डिंग नं.1 रूम नं.ए-104 पहिल्या मजल्यावर घडली. याबाबतची फिर्याद अंकुश किसन काळे (वय-45) सध्या रा.निजामपूर रोड,अमित कॉम्प्लेक्स माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराचा कुलूप हत्याराने कापून घरात प्रवेश करून घरफोडी चोरी करून घरातील एक सोन्याची अंगठी, एक सोन्याचे लॉकेट, एक चांदीची साखळी व रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून तो पसार झाला आहे.सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.140/2022 भादवि संहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम.एच.खिरीट हे करीत आहेत.

Exit mobile version