वणव्यात झाडे जळून खाक

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील मौजे फळशेत येथील जंगलात अचानक लागलेल्या वणव्यात शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत.हा वणवा नैसर्गिक होता की मानवनिर्मित हे अद्यापही समजू शकलेले नाही. मात्र, वाणव्याची प्रखरता एवढी मोठी होती की शेकडो कलमी काजू आंब्यांच्या झाडांची राखरांगोळी झाली आहे. तालुक्यातील फळशेत येथील जंगलात ग्रामस्थांची मालकीची कलमी काजू व आंब्यांची झाडे आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आंबा व काजू विक्री करून येथील शेतकरी आपला उदरनिर्वाह भागवितात. साधारणतः मार्च महिन्यात झाडाला मोहोर यायला सुरुवात होते व मे महिन्यात सर्वच आंबा, काजूची झाडे फळांनी भरून गेलेले असतात. आपल्या शहरातील नातेवाईकांना उन्हाळी रानमेवा म्हणून येथील शेतकरी आंबा व काजू पाठवितात. यातील काही माल तळा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो व विक्रीतून मिळालेल्या पैशांतून स्वतः सह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जातो. मात्र अचानक लागलेल्या वणव्यात सर्वच झाडे मातीमोल झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास थोडक्यासाठी हिरावला गेल्याने येथील शेतकर्‍यांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Exit mobile version