। तळा । प्रतिनिधी ।
चरई गौळवाडी गावाजवळील मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाचा लोखंडी कठडा तुटल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाचा लोखंडी कठडा तुटूनही प्रशासन झोपेत असल्याचे चित्र समोर आले आहे.
जीवाशी खेळ सुरू असताना संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र, कठडा तुटल्यामुळे पुलाच्या कडेला कोणतीही सुरक्षा उरलेली नाही. एखादे वाहन थोडे जरी घसरले तरी थेट खाली नदीत कोसळण्याचा धोका आहे. हा पूल अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून, त्याची दुरुस्ती वेळोवेळी करण्यात आलेली नाही. अलीकडेच पुलाच्या बाजूचा लोखंडी कठडा तुटल्याचे निदर्शनास आले. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहनचालकांना पुलाच्या कडेला असलेली ही धोकादायक स्थिती लक्षात येणे कठीण ठरत आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. “अपघात झाल्यावरच जाग येणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तातडीने पुलाची दुरुस्ती करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
“आम्ही ग्रामस्थांनी या समस्येबाबत ग्रामपंचायत तसेच माननीय मंत्री महोदय यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून कळवले आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, ही आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.”
केतन वाजे
ग्रामस्थ चरई गौळवाडी
“संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्गा बरोबर याबाबतीत बोलणे झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात या पुलावरील लोखंडी कठडाचे काम पूर्ण करण्यात येईल.”
प्रविण अंबारले
सरपंच







