नेरळ मध्ये ब्राम्हण सभेची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नसरापूर येथील लहानग्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन नेरळ पोलीस यांना देण्यात आले. ब्राह्मण सभा, नेरळ आणि ब्राह्मण सखी, नेरळ तर्फे 1 मे 2026 रोजी नसरापूर येथे घडलेल्या घटनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे येथे जमले होते.
पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या घटनेत एका 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पुढे त्या बालिकेला दगडाने ठेचून तिची निघृणपणे हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आता राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.नेरळ येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर करण्यात आले. ब्राह्मण सभा,नेरळ आणि ब्राह्मण सखी यांनी एकत्र येत ही निवेदन दिले.या निवेदनात संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कीर्तनकार आसावरी काळे यांनी ब्राह्मण समाजाचे वतीने हे निवेदन पोलिसांना दिले.तर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी ही निवेदन स्वीकारले.







