| तळा | प्रतिनिधी |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे शनिवारी (दि.2) मे रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी केले. प्रस्तविकाच्या माध्यमातून महाविद्यालयाचा मागील शैक्षणिक वर्षाचा आलेख त्यांनी सादर केला, तसेच महाविद्यालय विकासाच्या वाटेवर कसे कार्यरत आहे याची मांडणी केली. या समारंभाची सुरुवात स्नातक व विद्वत जन यांच्या मिरवणुकीने करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत रोडे यांनी ज्ञान हीच या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे हे लक्षात घेत स्नातकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख यांसारख्या महामानवांच्या जीवनातून शिक्षणाची व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी व आपले, गावाचे व आपल्या या महाविद्यालयाचे नाव उज्वल करण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या समारंभासाठी मारुती शिर्के, विठ्ठल जोशी, श्रीराम कजबजे, महादेव बैकर, दीपक कोटिया, चंद्रकांत खातू, प्रमोदिनी मेकडे, दिलीप ढाकणे, प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे निवेदन
डॉ. भगवान लोखंडे यांनी केले. पदवी प्रमाणपत्र वितरण डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी तर कार्यक्रमाचे आभार परीक्षा विभाग प्रमुख डॉ.तृप्ती थोरात यांनी मानले. हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी बहुमोल सहकार्य केले. या समारंभासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक,पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







