| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील वाशी महागाव येथे लागलेल्या वणव्यात गुरांचा गोठा जळून खाक झाला असून, यामध्ये एक गाय व दोन वासरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा तालुक्यातील मौजे वाशी महागाव येथे दुपारच्या सुमारास अचानक वनवा लागला. भर दुपारी लागलेल्या या वनव्याचे स्वरूप भयंकर असल्याने या भागातील आंबा, काजू बागायती वनव्यात जळून खाक झाल्या. याच ठिकाणी गावातील शेतकरी उमाजी खांडेकर यांचा गोठा होता. या गोठ्यामध्ये एक गाय व दोन वासरे दावणीला बांधली होती. वनव्याच्या प्रखरतेत हा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून, दावणीला बांधलेल्या गायीचा व दोन वासरांचा देखील होरपळून मृत्यू झाला. यावेळी वाशी महागाव भागातील समाज नेते रवींद्र माडंवकर यांनी माहिती देताना सांगितले की या भागात लागलेल्या या वणव्यात निगुडशेत, वाशी महागाव या शिवारातील अनेक आंबा काजू बागायती त्याचबरोबर वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या बाबतीत लक्ष देत शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.






