। अलिबाग | प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर शुक्रवारी (दि.28) पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. कोस्ट गार्ड व नेव्हीच्या मदतीने बोटीमधील सर्व 18 खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बोट आता आक्षी किनारी आणण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी अलिबागच्या किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात एका मच्छीमार बोटीला अचानक आग लागली. स्थानिक मच्छीमारांनी ही आग पाहून मदतीसाठी धाव घेतली. मात्र, आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बोट जळून खाक झाली. या दुर्घटनेत बोटीचे 80 टक्के नुकसान झाले असून, बोटीवरील जाळी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. या बोटीवर18 ते 20 खलाशी असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, सुदैवाने सर्व खलाशी सुखरूप बचावले आहेत. आग लागल्यानंतर खलाशांनी वेळीच समुद्रात उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. स्थानिकांच्या मदतीने सर्वांना सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणण्यात आले. एकविरा माऊली असे बोटीचे नाव असून, इंजिनचा टर्बो फेल होऊन ऑइल सायलेन्सर मध्ये जाऊन इंजिन ने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोट साखर गावातील मच्छीमार राकेश मारुती गण यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपल्या बोटीचे नुकतेच देखभाल-दुरुस्तीचे काम केले होते. त्यामुळे आग लागण्यामागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व तहसील कार्यालयातील अधिकारी अलिबाग नगरपरिषदमधील अग्निशमन यंत्रणा देखील घटनास्थळी पोहचली. यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलीस तपास करत आहेत.