| प्रयागराज | वृत्तसंस्था |
महाकुंभ मेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर -प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी कारही ट्रकमध्ये घुसली. अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक जबलपूरहून कटनीच्या दिशेने जात होता. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सिहोरातील मोहला बरगी गावाजवळ ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारला धडक देऊन ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनवर पोहोचला. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रॅव्हलरला धडक दिली. प्रयागराजहून आंध्र प्रदेशला परतणाऱ्या ट्रॅव्हलरला धडक बसून जागीच सात जणांचा मृत्यू झाला.