| नागपूर | प्रतिनिधी |
नागपूरमध्ये कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला असून, या अपघातात तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कार विहिरीत कोसळली. रस्त्यालगतच असलेल्या विहिरीला कठडा नसल्यानं रस्त्यावरून अनियंत्रित कार थेट विहिरीत गेली. कार विहिरीत कोसळल्यानंतर गाडीतील तरुणांना बाहेर पडता आलं नाही. तिघेही आतच अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बुटीबोरी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. तरुणांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. रात्रभर बचावकार्य सुरू होतं. विहिरीत पडलेल्या कारमधून तरुणांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र कार बाहेर काढण्याआधीच तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.