| पनवेल | प्रतिनिधी |
अभ्यासाच्या ताणामुळे एका विद्यार्थ्याने दुचाकी घेऊन पनवेल शीव महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि.10) रात्री सव्वासात वाजता रोडपाली येथील पुरुषार्थ उड्डाणपुलावर घडली. सुदैवाने या अपघातामध्ये संबंधित विद्यार्थी बचावला आहे. मात्र, त्याची प्रकृती अजूनही अत्यवस्थ आहे. त्याच्यावर नजीकच्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत कामोठे पोलीस ठाण्यात रितसर सोमवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित विद्यार्थी हा दुचाकीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने शीव पनवेल महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करत होता. संबंधित व्हॅगनर मोटारीचे आणि दुचाकीचे सुद्धा या अपघातामध्ये मोठे नूकसान झाले. रोडपाली उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने जाण्याच्या मार्गिकेवर विद्यार्थ्याने दुचाकी चढविली. रात्रीच्यावेळी या उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने वाहन धावतात. त्याच वाहनांच्या गर्दीत हा अपघात घडला. व्हॅगनर मोटारीला ठोकल्यानंतर जखमी दुचाकीस्वाराची चौकशी केल्यावर जखमी मुलाने ‘माझी तब्येत बरी नाही, माझा अभ्यास होत नाही. मला आत्महत्या करायची’, असे मुलाने सांगितले. जमलेल्या प्रवाशांनी तातडीने पोलीसांना बोलावले. तात्काळ कामोठे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी इतर जमलेल्या व्यक्तींच्या मदतीने जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले. रात्री उशीरापर्यंत हा विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. या संवेदनशील घटनेचा तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रियंका खरटमल या करीत आहेत.