| पुणे | प्रतिनिधी |
ससून रुग्णालय परिसर, तसेच वारजे भागात पादचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन आणि वारजे पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण भोसरीत राहायला आहे. तो सोमवारी (दि.10) सकाळी साडेपाचच्या सुमारास ससून रुग्णालयाजवळून निघाला होता. ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच चोरट्यांनी त्याला अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखवून 15 हजार रुपयांचा मोबाइल संच चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत वारजे भागातील रामनगर परिसरात पादचारी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील 300 रुपयांची रोकड लुटण्यात आली. याबाबत एका तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रामनगर भागात राहायला आहे. तो 8 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करुन बाहेर पडला. त्या वेळी चाैघांनी त्याला काेयत्याचा धाक दाखवून खिशातील रोकड काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करीत आहेत.