| सुकेळी | प्रतिनिधी |
मुंबई -गोवा महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे. सोमवारी (दि.10) रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये जिंदाल कंपनीच्या समोरच डंपर चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. मात्र, यावेळी अपघात घटनास्थळावरुन डंपर चालकाने गाडीमधून उडी मारुन तेथुन पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, वडखल बाजुकडुन महाडच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा डंपर सुकेळी गावाजवळ आला असता, चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूला साइडपट्टीवर डंपर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. याच ठिकाणी मागील एका महिन्यापासून तीन ते चार अपघाताच्या घटना घडल्या असुन, या ठिकाणी साइडपट्टीच्या खाली माती किंवा खडीचा भराव करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोकळे यांनी केली आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबच्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघाताची पाहणी करीत वाहतुक सुरळी केली. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.