| उरण | वार्ताहर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच लोकार्पण झालेल्या अटल सेतुवरून लवकरच उरणकरांसाठी बेस्टची प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अल्पावधीतच मुबंई गाठणे शक्य होणार आहे. यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळणार आहे.
या सेतुवरून बेस्ट बस सेवा सुरू करावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. यानंतर बेस्ट बसच्या 4 बसची ट्रायलही उरण शहरात करण्यात आली. या प्रीमियम बससेवेनंतर सामान्यांची एसटी बसही या मार्गावर चालविण्यात येणार आहे. सार्वजनिक वहानांचा टोल भार सरकार सहन करीत आहे. त्यामुळे सामान्य बसच्या तिकीट दरा इतकाच या बसचा दर असेल असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बस सेवा सुरू केल्यानंतर प्रतिसाद चांगला मिळाला तर या मार्गावर बेस्ट बस गाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या सेतुवरून बस कोर्ट मार्गाने व कधी जाईल याचा वेळापत्रक ठरविण्याचे काम सुरू आहे. यामुळे मात्र ज्यांची या सेतुवरून जाण्याची इच्छा आहे, परंतु चारचाकी नसल्याने अधुरे राहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.