धोकादायक इमारतींमध्ये थाटला व्यवसाय

चार शासकीय इमारतींचा समावेश

| उरण | वार्ताहर |

पावसाळ्यात जीर्ण झालेली इमारत, घर पडून जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी उरण नगरपालिकेने आपल्या परिसरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू केला आहे. या सर्व्हेमध्ये शहरातील 78 इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील धोकादायक इमारतींना उरण नगरपालिकेने नोटीसा बजावण्याचे काम केले आहे, अशी माहिती उरण नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. यामध्ये चार इमारती या शासकीय इमारती असून, त्या धोकादायक आहेत. मात्र, काही धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी आजही वास्तव्य करत असून, काही व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थाटून ग्राहकांच्या जीवाशी खेळ मांडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारती दरवर्षी पडण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना उरण शहरात घडू नये यासाठी यावर्षी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना दिले होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये उरण शहरात 78 इमारती धोकादायक असल्याचे पुढे आले आहे. अशा धोकादायक इमारती पावसाळ्यात पडून एखादी जीवितहानी होऊ शकते. याचे गांभीर्य ओळखून उरण नगरपालिकेनी संबंधित इमारत, घर मालकांना नोटीसा बजावण्याचे काम केले आहे. तसेच संबंधित इमारतीतील नागरिकांना नोटीसा दिल्या असून, त्यांना इमारती खाली करण्यास सांगितले असल्याची माहिती नगरपरिषदेकडून प्राप्त होत आहे.

मात्र, असे असतानाही काही धोकादायक इमारतींमध्ये आजही रहिवाशांनी आपला संसार थाटला आहे, तर काही व्यावसायिकांनी ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळत आपला व्यवसाय सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. अशा व्यावसायिकांकडून उरण नगर परिषद व्यवसाय कराची वसुली सुरू करत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार हे नगर परिषदेचे अधिकारी वर्ग असणार आहे, अशी प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version