संकष्ट चतुर्थी निमित्ताने महागणपती चरणी लीन
| चिरनेर/उरण | वार्ताहर |
हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील महागणपती चरणी नतमस्तक होण्याचा योग भाविकांसाठी रविवारी (दि.11) आलेल्या संकष्ट चतुर्थी निमित्ताने जुळून आला. त्यामुळे महागणपती चिरनेर चरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील अनेक भक्तांनी आपापल्या कुटुंबासह मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तसेच उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या 18 डिसेंबर रोजी पार पडणार असल्याने ग्रामपंचायत उमेदवारांबरोबर कार्यकर्ते श्रींच्या चरणी दर्शनासाठी गर्दी करत होते.
नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर गावातील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. या गणेशाच्या दर्शनाला व हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते, अशा लाडक्या श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याच भाग्य हे या वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थी निमित्ताने आलेल्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जुळून आला. त्यामुळे राज्यभरातील भाविकांनी तसेच तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हे श्री गणेशाच्या मंदिरात दर्शनार्थ पहाटेच्या सुमारास ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
यावेळी मंदिरात श्रीचे अभिषेक, सकाळी काकड आरती, भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भक्तगन भावनिक वातावरणात तल्लीन झाले होते. येणार्या भाविकांना श्रींचे दर्शन सुलभ घेता यावे यासाठी मंदिर कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ सहभाग घेत होते. त्यामुळे अनेक भाविकांच्या चेहर्यावर प्रसन्नता दिसत होती.