शेकापचे अरविंद म्हात्रे, ॲड. मानसी म्हात्रेे यांनी भरला अर्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोमवारी (दि.1) शेवटच्या दिवसापर्यंत सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये शेकापचे उमेदवार अरविंद म्हात्रे, ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह अपक्ष म्हणून अनिल चोपडा यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघामध्ये 1 हजार 5 मतदार आहेत. त्यामध्ये रायगड विधान सभा मतदार संघातील 518, रत्नागिरीमधील 274 आणि सिंधुदूर्गमधील 213 मतदारांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील 7 विधान मतदार संघातील पनवेलमध्ये 94, कर्जतमध्ये 110, उरणमध्ये 32, श्रीवर्धनमध्ये 115, अलिबाग 58, पेण 57 आणि महाड मतदार संघात 52 मतदार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या निवडणूकीसाठी सोमवारी (दि.1) शेवटच्या दिवसापर्यंत 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून पनवलेचे अरविंद म्हात्रे, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी अर्ज भरले आहेत. तर, अलिबाग नगरपरिषदेचे जलनिस्सारण सभापती अनिल चोपडा यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यावेळी ॲड. निलम हजारे, संतोष गुरव, ऋषीकेश माळी, अश्वीनी ठोसर, वृषाली ठोसर, सागर भगत, प्रकाश पाटील, व मनोज पाटील आदी उपस्थित होते.
तसेच, रत्नागिरीमधील उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने हे उमेदवार रत्नागिरी, सिधंदूर्ग आणि रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेच्या रिंगणात आहेत. तसेच, राष्ट्रवादी अजित पवार गटातले माजी आ. अनिकेत तटकरे, शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.









