| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग लगत असलेल्या सिमरन मोटर्स सर्व्हिस सेंटर समोर दुपारच्या सुमारास एक भीषण घटना घडली. एक दुचाकीस्वार आपल्या गाडीवरून पेट्रोलने भरलेला कॅन घेऊन जात होता. त्यावेळी पाऊस पडत असतानाही अचानक दुचाकीला आग लागली आणि त्यात दुचाकी जळून खाक झाली. त्याचबरोबर दुचाकीस्वार सोबत घेऊन जात असलेल्या पेट्रोल कॅनमधील पेट्रोल रस्त्यावर सांडून वाहत गेल्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेली व्हॅगनार गाडीने देखील पेट घेतला. यादरम्यान, घटनास्थळी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी महाड नगरपरिषद तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाने शर्यतीचे प्रयत्न केले. परंतु, आगीने रुद्र रूप धारण केल्यामुळे ती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागला. मात्र, तोपर्यंत दोन्ही वाहने पुर्णपणे जळून मोठे नुकसान झाले. महत्त्वाचे म्हणजे सर्व्हिस रोडलगत सिमरन सर्व्हिसिंग सेंटरची वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बेकायदेशीर पेट्रोल वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारासह सिमरन मोटर्स सर्व्हिसिंग सेंटरवर पोलीस कारवाई करतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बेकायदेशीर पेट्रोलमुळे दुचाकीसह कार खाक
