सुकेळी येथे कारची ट्रकला धडक; चालक गंभीर जखमी

| सुकेळी | वार्ताहर |

मुंबई -गोवा महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरुच असतांनाच सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या समोर कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या समोर ट्रक चालक हा आपल्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करुन बाहेर गेला होता. याचदरम्यान नागोठणे बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार सरळ जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली. कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारमधील एअर बॅग उघडल्यामुळे कार चालक बचावला मात्र त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. जखमी कार चालकाचे नाव विशाल कदम( (29) रा. माणगाव असे आहे. यावेळी येथील स्थानिक कार्यकर्ते सतिश सुटे, निखिल करंजे आदि ग्रामस्थांकडून कारमधील दुखापतग्रस्तांना प्रथमोपचारासाठी मदतीचा हात देऊन जिंदाल कंपनीच्या रुग्णवाहिकेतून जिंदाल रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी जिंदाल रुग्णालयातील डाॅ. मनिष रायकवार यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले. मात्र यावेळी ट्रक चालकाने तेथून पळ काढला.‌ दरम्यान वाकण टॅबच्या सहायक पोलिस निरीक्षक गितांजली जगताप यांच्यासह त्यांचे संपुर्ण कर्मचारी तसेच नागोठणे पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींनी पाहणी करुन अपघातग्रस्त दोन्हीही वाहने रस्त्यावरुन बाजुला करुन वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. तसेच महामार्गावर सुकेळी जिंदाल कंपनीच्या समोर काॅईल घेऊन जाणा- या ट्रेलरच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागत असुन त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत.

Exit mobile version