गाड्या भाड्याने देणाऱ्यांनो सावधान!

उरणमध्ये ‘महाठग’चा कारनामा उघड

| उरण | प्रतिनिधी |

उरणचा झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास आणि मनुष्यबळाच्या ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची वाढती मागणी याचा गैरफायदा घेत एका महाठगाने वाहनमालकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीत गाड्या भाड्याने लावतो असे सांगून घेतलेल्या वाहनांची मालकांच्या परवानगीशिवाय परस्पर विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने काही वाहनमालकांकडून गाड्या भाड्याने घेतल्या. सुरुवातीचे काही महिने नियमित भाडे अदा करून विश्वास संपादन केला. गाडी कंपनीत सुरू असल्याचे सांगत मालकांना अंधारात ठेवले. मात्र, प्रत्यक्षात त्या वाहनांची परस्पर विक्री केल्याचे नंतर उघड झाले. काही महिन्यांनंतर या प्रकाराची भांडाफोड झाली. मूळ मालकांनी शहानिशा केली असता त्यांच्या गाड्या संबंधित कंपनीत नसून इतरत्र विकल्या गेल्याचे समजले. आश्चर्याची बाब म्हणजे गाड्या खरेदी करणाऱ्यांनी मूळ मालकाशी किंवा ओरिजिनल कागदपत्रांबाबत कोणतीही खातरजमा न करता व्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. कमी किमतीत वाहनांची विक्री केल्यामुळेच हे व्यवहार झाले असावेत, असा संशय व्यक्त होत आहे.

भांडाफोड होताच वाहनमालकांनी आपापल्या गाड्या परत मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. काही वाहनांची परत देवाणघेवाण करून ताबा मिळाल्याचीही चर्चा आहे. मात्र, या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कंपनीत गाड्या भाड्याने देणाऱ्या वाहनमालकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. आपले वाहन प्रत्यक्षात कंपनीतच चालते आहे की नाही, याची नियमित खातरजमा करावी, अन्यथा परस्पर विक्री होण्याचा धोका नाकारता येत नाही, असा इशारा जाणकारांकडून देण्यात येत आहे.

Exit mobile version