कातळशिल्पांना चिरेखाणींचा धोका

। रत्नागिरी । वार्ताहर ।

संस्कृतीवर प्रकाश करणारी कोकणातील जांभ्या कातळावर कोरलेली कातळेशिल्पे बदलत्या काळात माणसाच्या अतिक्रमणामुळे अडचणीत आली आहेत, अशी चिंता शिल्पप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. कातळावरील चिरेखाणी या कातळशिल्पांसाठी अडचणीच्या ठरू शकतात. त्या दृष्टीने प्रशानाकडून पावले उचलली पाहिजेत.

कोकणातील मोकळ्या माळरानावर हजारो वर्षापूर्वी कोरण्यात आलेल्या शिल्पांना निसर्गापासून कोणताही धोका नाही. तसे असते तर काळाच्या ओघात त्याचे अस्तित्व नामशेष झाले असते. प्रदीर्घ काळातील ऊन, वारा, पाऊस व उष्णता वा वातावरणातील बदलांचा या शिल्पावर काहीही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी शिल्पे आढळून आल्यामुळे कातळशिल्पाबद्दल समाजात मोठी जागृती झाली आहे. शिल्पांचे स्थान जांभा कातळात व शक्यतो मानवी वस्तीपासून मोकळ्या माळरानात आढळून येतो. कोकणात घरांच्या बांधकामाकरिता जांभा दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे चिरे काढणार्‍या खाणी जागोजागी व गावागावात आहेत.

चिरेखाण ही जमिनीचा कडक व दगडी पृष्ठभाग संपल्यावर काही ठराविक कालावधीनंतर दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात येते. त्यामुळे अज्ञानापोटी या कातळशिल्पाची नासधूस होण्याची शक्यता आहे. कातळशिल्पे सापडलेला परिसर वगळता सर्वच ठिकाणी चिरेखाणी आहेत. त्या खाणीतील माती पावसाच्या पाण्यामुळे शिल्पावर येते. कोकणातील लाल चिर्‍यांनी सध्या पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. खाणीतील चिर्‍यांना मोठी मागणी असल्याने चिर्‍यांचे उत्पादन दरवर्षी वाढत आहे.

कोकणातील कातळशिल्पे ही प्रागैतिहासिक मानवाची कोकणसंदर्भात वेगळीच ओळख सांगते. ही कातळशिल्पे जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. राजापूर आणि रत्नागिरी परिसरात कातळशिल्पांची नोंद शासनाने केलेली असल्यामुळे त्याचे संरक्षण होत आहे. पुढील पिढ्यांचा वारसा म्हणून टिकवून ठेवण्यासाठी कातळशिल्पांभोवती संरक्षक कठडा उभारणे आवश्यक आहे.

डॉ. अजय धनावडे,
कातळशिल्प संशोधक
Exit mobile version