मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

। नागोठणे । प्रतिनिधी ।

पाईप टाकण्यावरुन तसेच पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी तसेच, साक्षीदारांना कळकीची रिप व लोखंडी सळीने जमावाकडून मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.24) दुपारच्या सुमारास पेण तालुक्यातील साखळी जांभूळटेप येथील रस्त्याचे बाजूला असलेल्या तलावाजवळ घडली. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार साखळी जांभूळटेप रस्त्याचे बाजूला असलेल्या तलावाजवळ व साखळी येथे रस्त्यावर फिर्यादी व साक्षीदार (रा. पंचवटी) हे त्यांचे मालकीच्या तळ्यात मच्छिमारी करून बाहेर निघाले. त्यावेळी चार आरोपींनी फिर्यांदींना पाईप टाकण्यावरून तसेच मागील भांडणाचा राग मनात धरुन झालेल्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळी करून हाताबुक्क्याने मारहाण केली. याशिवाय आरोपी क्र.1 याने तेथे असलेल्या कलकीच्या रिपेने फिर्यादींच्या डोक्यात मारल्याने रिपेला असलेली लोखंडी चूक फिर्यादीच्या डोक्यास लागून दुखापत केली. तर आरोपी क्र.2 व आरोपी क्र. 5 व 6 या तिघांनी साक्षीदाराला मारहाण केली.
रायगड जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदीचा आदेश असतानाही वरील सर्वांनी बेकायदेशीर जमाव केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रमोद कदम हे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version