। अलिबाग । प्रतिनिधी ।
घरासमोरील शेडमध्ये वाहन पार्किंग करण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला. रागाच्या भरात चाकू, तलवारीने वार करून आवासमधील एकाचा खून करण्यात आला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
आवास येथील विवेक राणे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या चार चाकी गाडीमध्ये पावसाचे पाणी जात होते. त्यामुळे त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये गाडी पार्किंग करीत होते. त्यावेळी आरोपींनी त्याठिकाणी चाकू, तलवार घेऊन येऊन फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळी केली. मागील भांडणाचा राग धरून वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी फिर्यादीच्या भावाला पकडून ठेवले. त्यानंतर देवेंद्रने त्यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्यांना गंभीर जखमी केले. शुभम पाटीलने विश्वासला पकडून आरोपीत अंकित राणे याने ठारच मारतो, असे बोलून त्याचे छातीत सुद्धा चाकू भोसकला. फिर्यादी यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून आरोपीत सिया म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरता आली असता, आरोपी पूनम म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे आईच्या मानेवर सुरा मारून दुखापत केली. यामध्ये धर्मेंद्र नंदुकूमार राणे गंभीर जखमी होऊन मृत पावले आहेत. तसेच विवेक राणे, विश्वास राणे, करुणा राणे हे तिघेजण जखमी झाले असून अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याप्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.