। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आवास येथे गुरुवारी (दि.२२) सायंकाळी दोन गटात पूर्ववैमन्यस्यातून वाद होऊन एका तीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र राणे असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे आणि गावातील वैभव म्हात्रे याचे गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या मनात एकमेकांविरोधात प्रचंड संताप होता. गुरुवारी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात वैभवने चाकूने धर्मेंद्रच्या छातीवर वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, जखमीला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तो गंभीर जखमी झाल्याने त्याची प्रकृती खालावून तो मृत झाल्याचे डॉक्टरने सांगितले. आवासमध्ये झालेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
…अन्यथा अनर्थ टळला असता ?
वैभव आणि धर्मेंद्र या दोघांमध्ये तीन दिवसापूर्वी शाब्दिक वाद झाले होते. हे प्रकरण मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, तेथील पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची चर्चा गावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेथील पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर हा अनर्थ टळला असता अशी जोरदार चर्चा आहे.