खड्डे, काँक्रीटीकरणाच्या अपूर्ण कामाचा प्रवाशांना फटका
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते सोगाव पर्यंत काँक्रीटरस्ता तयार करण्यात आला. परंतु, अपूर्ण कामाबरोबरच रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. खड्डे व अपूर्ण कामाचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसत आहे.
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने शासनाच्या अर्थ संकल्पातून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. एका कंपनीला या रस्त्याचा ठेका देण्यात आला. पाचशे मीटर अंतरापर्यंत काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. परंतु, अपुर्ण स्थितीत असलेल्या कामामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. कनकेश्वर फाट्यापासून दोन ते तीन किलो मीटर अंतरावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लहान मोठी वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन लहान मोठी वाहने चालविण्याची वेळ चालकांवर येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा रस्ता होता. परंतु, आता हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम आता महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रवासी वर्गाकडून संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांकडून या रस्त्याची पाहणी कधी केली जाणार, रस्ता कधी सुस्थितीत होणार, असा सवाल उपस्थित केला जात असून, यंदा ही कनकेश्वर फाटा ते सोगावपर्यंतचा प्रवास खड्ड्यातून करण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते सोगाव रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. ज्या ठेकेदाराला काम दिले, त्यांनी योग्य पध्दतीने काम केले नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कनकेश्वर फाटा ते सोगाव रस्त्यावरील पाचशे मीटर अंतरावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या अर्थ संकल्पातून हा रस्ता मंजूर होता. परंतु, महाराष्ट्र राज्य पायाभूत रस्ते विकास महामंडळाकडे रस्ता वर्ग केल्याने आता हे काम संबंधित विभागामार्फत केले जाणार आहे. परंतु ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते खड्डे बूजविण्याच्या सूचना केल्या जातील.
तेलंग – उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग