| अलिबाग | वार्ताहर |
सर्वात जास्त रहदारीची मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवारपासून (दि. 26) बंद राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरिटाइम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मांडवा-मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवादेखील साधारण 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवा, करंजा ते रेवस, आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहील, असे मेरिटाइम मंडळाकडून कळविण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळा 7 जूननंतर सक्रिय होतो, मात्र यंदा लवकर पाऊस दाखल होणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे पीएनपी, अजंठा, मालदार या ऑपरेटर्सने वाहतूक दिलेल्या दिवसापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी साधारण 12 लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात, याशिवाय या मार्गावरून खासगी स्पीड बोटींचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर समुद्रात मोठ मोठ्या लाटा उसळत असल्याने त्यातून सावरणे बोटींना शक्य होत नाही. खबरदारी म्हणून दरवर्षी मेरिटाइम बोर्डाकडून गेटवे ते मांडवा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाते. दरम्यान, रेवस-करंजा, आगरदंडा-दिघी या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे. मुरूड-जंजिरा किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतिष देशमुख यांनी सांगितली.